सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा पालघर ह्यांच्या वतीने डिसेंबर २०२० ह्या महिन्यात ‘सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम’ आणि कुष्ठरुग्ण शोध अभियानाचे आयोजन झाले होते. क्षयरोग, कुष्ठरोगाविषयी असलेली भीती आणि गैरसमज ह्यामुळे लक्षणे असलेली व्यक्ती उपचारासाठी तयार होत नाही हे लक्षात घेऊन, क्षयरोग आणि कुष्ठरोग ह्यांचे निर्मुलन व्हावे ह्या उद्देश्याने ‘पुकार’ने अभियानामध्ये जनजागृतीची जबाबदारी घेतली. जनजागृती मोहीम सुरु केली.
पालघर तालुक्यातील: आंभान, बांधान, चरी, सावरखंड, कोसबाड, पोळे, दुर्वेस, साये, करळगाव, वांदिवली, वाकडी, वसरोली, खरशेत, काटाळे, लोवरे, गिरनोली, सागावे, कोकनेर, लालठाणे, सोनावे, दारशेत, बोट, वेह्लोली, खैरे, सातिवली ह्या एकूण २५ गावांमध्ये ११, १२,१३,१४,१५ डिसेंबर २०२० ह्या पाच दिवशी पुकार संस्थेच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन एकूण ५०१६ घरांमध्ये क्षयरोग, कुष्ठरोगाची लक्षणे आणि उपचाराची माहिती देणारे पत्रक प्रत्येक घरी देऊन समजावून सांगितले. ह्या रोगांविषयीचे व्हिडीओ पाड्यापाड्यावर दाखवून जनजागृती केली.
वेळेत तपासणी करून निदान केल्यास योग्य औषधोपचारांनी क्षयरोग, कुष्ठरोग बरा होतो हे लक्षात आणून देत लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना गावातील आरोग्य आशा सेविकेशी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करण्यास सांगितले.
गावांमधून संपर्क क्रमांक घेऊन तयार केलेल्या १५० ब्रॉडकास्ट लिस्टवरून पत्रक आणि व्हिडीओ पाठवून माहितीचा प्रसार केला.