‘प्रा. पुष्पलता भावे’ ताई यांना आदरांजली

‘प्रा. पुष्पा भावे’ ताई
स्त्रीवादी, गांधीवादी विचारांची मशाल तेवत ठेवणाऱ्या कृतीशील विचारवंत. प्राध्यापक, समीक्षक, लेखिका. कणखर आवाजात ठाम विचार मांडणारी एक रणरागिणी.
आज तुम्ही श्वासांना पूर्णविराम दिला.
जगणं संयमी, हिमतीचं, कर्तृत्वाचं असावं हे जस तुम्ही शिकवलं, तसं मृत्यूनंतरही आपल्या अभिव्यक्त  विचारांनी समाज हिताचे काम करता येईल अशी प्रेरणा आदर्श देऊन गेलात.
‘पुकार’च्या युथ फेलोशिप प्रकल्पासाठी अनेक वर्षे मार्गदर्शक म्हणून तुम्ही लाभणे हे आमचे भाग्य होते. प्रकल्पामध्ये तरुण वर्ग करत असलेल्या विविध सामाजिक विषयांवरील संशोधनाला तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला. बारीक नजरेने, त्याचबरोबर व्यापक अंगांनी संशोधन विषयाकडे पाहण्याचा तुम्ही दिलेला मूलमंत्र आजही लक्षात आहे.  दिशादर्शक आहे. तुमच्या ह्या मोलाच्या योगदानासाठी पुष्पाताई तुम्ही आमच्या कायम स्मरणात रहाल.
पुष्पाताई, तुम्ही आम्हाला दिलेली मुद्देसूद विचारांची शिकवण, तडफदार नजरेची धार, आमच्या सोबत आहे. तुमची समाजहिताप्रतिची निष्ठा आम्हाला या पुढेही ऊर्जा देत राहिल. तुम्हाला प्रेमपूर्वक आदरांजली.
 🌹🙏
असंख्य चळवळींना, विचारवंतांना, विद्यार्थ्यांना, संस्थांना मार्गदर्शन करणारी ज्ञानज्योत आज जरी मालवली असली तरी त्यांनी पेटवलेले अनेक विचारदिवे सर्वत्र लखलखत राहतील. एका विचारवंत शिक्षिकेला याहून मोठी आदरांजली ती काय!
ताई,
तुम्ही साहित्य आणि संघर्षाला एका सुरात ओवून
शब्दा-शब्दांत फुलं पेरलीत,
तुमच्या ओजस्वी वक्तृत्वाची तुतारी वेळोवेळी फुंकलीत,
अन्यायाविरुद्धच्या लढ्यात मुल्यांची धार लावलेली लेखणीतलवार हाती घेतलीत.
तुमच्या झुंझार आयुष्याला सलाम!
सलाम तुमच्या तीक्ष्ण नजरेला,
कणखर बाण्याला,
विवेकशील नेतृत्वाला,
अगाढ ज्ञानाला,
माणूसकीच्या प्रेमाला,
सलाम तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला,
तुमच्या निर्भय-बेधडकवृत्तीला,
तुमच्या चळवळीच्या ओढीला
सलाम तुमच्या तेजस्वी कारकिर्दीला!
पुकारच्या वतीने त्यांचे विद्यार्थी श्रुतिका-सुनीलने वाहिलेली प्रेममय शब्दांजली
 🌹🙏